Monday, 28 August 2017

रायगडचे बांधकाम आणि स्थापत्य..
रायगडवरील पाणीसाठा :- 
 रायगड ही राजधानी. अर्थातच गडावर राबता जास्त असणार. राजघराणे, सरदार घराणे, अष्टप्रधान आणि कुटुंब, नोकर चाकर, शिबंदी, सैनिक, आणि इतरही बाकी. या सगळ्यांसाठी लागणार्‍या पाण्याची सोय ही गडावरच करणे योग्य होत. त्याचबरोबर कधी दुष्काळ पडल्यास, कधी गडाला शत्रुने वेढा दिलाच तर तेवढे दिवस लागणारा अन्न-पाणी साठा हवाच. यासाठी गडावर एक ना अनेक असे जवळपास 10-12 तलाव आणि जवळपास 30 च्या आसपास टाके होती.

"आज्ञापत्र" यातही गडावरील पाण्याचा विशेष उल्लेख आहे तो असा-  "गडावरील आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाहीं आणि ते स्थळ तर आवश्यक बांधणे प्राप्त जालें (झाले) तरी आधीं खडक फोडुन तळीं-टाकीं पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे यैसी मजबुद बांधावी. गडावरी झराहि आहे, जैसे तैसे पाणीही पुरते, म्हणोन तितक्यावर निश्चिंती न मानिंता उद्योग करावा. किंनिम्मित्त कीं, जुझामध्ये भांडियाचे आहे आवाजाखालें झरें स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हा संकट पडतें. याकरिता तसे जागी जखेरियाचे पाणी म्हणोन, दोन चाळ तळीं टाकी बांधोण ठेऊन त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावें".
आज्ञापत्रात असलेल्या या उल्लेखावरूनच  गडावरील पाण्याचे महत्त्व लक्षात येते.  आपण गडावरील काही महत्वपुर्ण तलाव आणि टाक्याची माहीती घेऊ. यातील काही तलाव-टाकी ही आजही अस्तित्वात आहेत(दिसतात), काही दिसत नाहीत. ती दगड, मातीने बुजुन गेलीत.




महादरवाज्या वरील टाकी :- 
रायगडच्या चढणीत वाटेत कुठेही पाण्याची सोय नाही, (रायगडची जीवनकथा या ग्रंथात शां.वि.आवळसकर म्हणतात कि नाने दरवाज्याच्या वर एक टाक होत- मात्र सध्या ते आढळत नाही. पण मार्गाचा विचार करता इथे हे टाक असण स्वाभाविक आहे.) चढणीच्या वाटेत पाणी मिळते ते महादरवाज्यातच. या दरवाज्यावरच्या भागात पाण्याची टाकी आहेत हे बर्‍याच जणांना माहीत नसते. ही टाकी बहुदा महादरवाजाच्या शिबंदी साठीची पाण्याची सोय असावी. याच भागात शिबंदीच्या राहण्याचीही सोय असावी. महादरवाजाच्या वर चढुन समोरच्या डोंगरात बघीतल्यास ही टाकी लक्षात येतात. इथे चार टाकी असुन ती अर्धी खोदीव व अर्धी बांधलेल्या स्वरूपाची आहेत. (श्री. घाणेकर म्हणतात की या टाक्यांचा वापर शत्रु दरवाज्यात आला असता ती फोडुन शत्रुला वाहुन जाण्यासाठी करण्यात येत असावा, मात्र याठिकाणी कुठेही सुरूंगाच्या खुणा दिसत नाही).हे पाणी आजही पिण्यायोग्य आहे.

हत्तीतलाव:-

 (हत्ततलाव) महादरवाजा चढुन वर आल्यावर जो "40 मीटर × 25 मीटर" चा  पहीला तलाव लागतो तोच हा हत्ती तलाव. याच पुर्व नाव "हत्त" म्हणजे 'मृत' (संस्कृत) असाव. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ते हत्ती अस झाल असाव. हत्त याचा अर्थ संस्कृत मध्ये मृत म्हणजे मेलेल अस होत. हे खर असण्याच कारण या तलावात आजही पाणी राहत नाही. गड बांधताना या ठिकाणच्या दगडांचा वापर केला आणि याला तलावाचे स्वरूप देण्यात आला, मात्र दगड काढताना लावलेल्या सुरूंगामुळे यात पाणी राहत नाही असे लक्षात आल्यावर त्याचे नाव हत्त तलाव असे ठेवण्यात आले असावे. या तलावाच्या आतील बाजुस तळापासुन नऊ मीटर उंचीवर काही चित्र कोरलेली आहेत. यात चौरंगासारख्या बैठकीवर एक कलश, त्यात आंब्याची पाने, केळीचे खुंट,  आणि माशांची चित्रे आहेत. (संदर्भ- दुर्गदुर्गश्र्वर रायगड- श्री.घाणेकर.) फोटो देत आहे.



गंगासागर तवाव:-

 गडावरील पाण्याचा सर्वात मोठा स्त्रोत असलेला तलाव म्हणजे गंगासागर तलाव. हा तलाव (120 मी.× 100 )मी आकारचा आहे. हा तलाव बालेकिल्ल्याच्या खालीच आहे. त्यामुळे लगेच नजरेस भरतो. राजाभिषेकास आणलेल सात नद्याच पवित्र जल या तलावात सोडल्यामुळे कदाचित याला हे नाव पडलं असावं. या तलावाच्या आत खांबटाकी आहेत. (पाणी असल्याने ती दिसत नाहीत, मात्र उन्हाळ्यात दिसु शकतील).
या तलावातील गाळ काढताना (सन 7 मे 1987- 28 मे 1987) काही महत्वपुर्ण गोष्टी सापडल्या होत्या. यात एक लाकडी होडी, पाच किलो वजनाचा तवा, एक संपुर्ण व एक अर्धा तोफेचा गोळा, 15-20 शिवराया, दोन मोगली व एक ईस्ट इंडिया कंपनीचे नाने-  पितळी कुंकवाचे तीन करंडे, श्री. खंडोबाची लहान मुर्ती, व 2 तुटलेली कोटबी(पाणी काढायचे भांडे) मिळाली होती.

हनुमान टाक:-
  रायगडच्या लोहखांबाच्या जवळ असलेल हे एक खोदीव टाक.. हे जोड टाक आहे. दगडी भिंतीने या टाक्याचे विभाजन झाल आहे. यालाच चांभार टाके अस पण नाव आहे. याची लाबी तीस फुट(30) रूंद आणि रूंदी आठ ते दहा (8-10) फुट आहे. या टाक्याच्या बाहेरील बाजुला तीन कोनाड्या आहेत, त्यापैकी मधल्या कोनाड्यात हनुमानाची मुर्ती आहे, तीचा पाय मात्र तुटला की तोडला आहे. उजव्या आणि डाव्या बाजुचे कोनाडे रीकामे आहेत.  या टाक्याच्या बाहेरच्या आणि आतल्या बाजुस $ या सारखी चिन्हे आहेत, मात्र हे काय याचा निटसा अंदाज लागत नाही.


काळ टाक:-
छ. शिवरायांच्या समाधीपासुन मागे भवानी टोकाकडे जातानाच्या वाटेवर एक टाक लागत.. यालाच काळ टाके म्हणतात.
याला काळे टाके म्हणतात हे मात्र माहीत नाही.

बारा टाके:-
संख्येने एकुन चौदा असलेली.. पण बारटाकी नाव पडलेली ही टाकी समाधी पासुन भवानी टोकाकडे जाताना जे कोठार आहे त्याच्या जवळ आहे. ही टाकीही खोदीव प्रकारातली आहेत. ही टाकी अंतर्गत जोडलेली आहेत असा समज आहे, पण तो खोटा आहे. या टाक्यांच्या एका दगडावर शरभशिल्प जोडलेल आहे. या टाक्यांची रचना बघता ही टाकी शिवपुर्वकालीन असावी हे नक्की.
 या टाक्यांच्या बाजुलाच आणखी एक तलाव आहे. त्याला वेगळे नाव नाही.

कोळींब तलाव:- 

 नगरपेठे(बाजारपेठ) पासुन वाडेश्वराकडे (जगदीश्वराकडे) जातानाच्या वाटेवर डाव्या हाताला एक मोठ्ठा तलाव आहे.. तोच हा कोळींब तलाव. या तलावाच्या आतल्या उत्तर भागात काही खोदीव लेणी/खोल्या आहेत. त्यात उतरायला पायर्‍या देखील आहेत. या लेण्यांचा / खोल्यांचे बांधकाम बघता हा ही तलाव/ टाक/ लेण/ खोली हे शिवपुर्वकालीन आहे अस लक्षात येते. इथला दगड जलभेद्य म्हणजे (इमपव्हिअस राॅक) आहे.





कुशावर्त तलाव-
नगारखान्यापासुन होळीच्या माळावर जाताना उजव्या बाजुला एक वाट खाली वाघ दरवाज्याकडे उतरते, त्याच वाटेवर एक शिवमंदिर आहे आणि त्याच्याच समोर हा कुशावर्त तलाव आहे. इथेच श्रीगोंदे टोक आहे, काही वाड्यांचे अवशेष आहेत. याच ठिकाणच्या कोणत्याश्या वाड्यात कवी कलश राहत होता.
 गडावर फक्त हिच टाकी किंवा तलाव होते असे नाही.. या व्यतिरिक्त गडावर बराच जलसाठा होता. त्या बद्दल नंतर सविस्तर माहिती देईलच.

टीप :- काही त्रांत्रिक कारणास्तव फोटो देऊ शकत नाही.. लवकरच फोटो उपलोड होतील 




Tuesday, 22 August 2017

रायगडचे बांधकाम आणि स्थापत्य.. भाग -1

रायरी उर्फ रायगड महाराजांनी जावळीच्या मोरेंकडुन जिंकुन घेतला आणि पुढे त्याचे नाव ठेवले रायगड. पुढे याच रायगडाने स्वराज्याचे वैभव अनुभवले. हा रायगड अभेद्य होता.. असाध्य होता..स्वतंत्र होता.. आजही आहेच. अगदी 'केळदिनुपविजयम्' या ऐतिहासिक कानडी काव्यांतही रायगडचे वर्णन "भुतलांत (पृथ्वीवर) आश्चर्यकारक म्हणून गणला जाणारा रायरी" असे केले आहे.
हा रायगड असा कसा? 
महाराजांनी जर या किल्ल्याचा वापर राजधानी म्हणुन करायचा ठरवला होता तर त्यामागे कारणे होती; गडाची नैसर्गिक अभ्येद्यता, ताशीव कडे, सह्याद्री पासुन वेगळा झालेला डोंगर ..... याच बरोबर किल्याचे बांधकाम आणि नंतर स्थापत्य कला.  
महाराजांनी कल्याणचा सुभेदार आबाजी सोनदेव यांस आज्ञा करून रायगडावर राजधानीस त्या इमारती बांधण्यास सांगितले. हिरोजी इंदुलकर  (कि इटळकर?) यांनी ते बांधकाम केले. हिरोजींनाच या राजधानीचे बांधकाम का मिळाले असेल बरं? तर त्यामागे ही एक गोष्ट आहे- महाराजांनी सुरत लुटुन त्या पैश्यातुन सिंधुदुर्ग बांधला.. त्याचे बांधकामही हिरोजींनीच केले, मात्र बांधकाम चालु असतानाच पैसा संपला आणि बांधकाम थांबले, याही वेळेस (असेच रायगडलाही झाले) हिरोजींनी जमीन जुमला विकला आणि गडाचे बांधकाम पुर्ण केले. महाराज गडावर आल्यावर त्यांनी विचारले हिरोजींना; की बोला हिरोजी काय हवयं? त्यावर हिरोजी म्हणाले- महाराज ज्यावेळी राजधानी बांधाल.. त्यावेळी ते बांधण्याच सौभाग्य मला द्या..आणि म्हणुनच राजधानी बांधण्याचे जिकरीचे काम हिरोजींना मिळाले. (पुढे रायगड बांधतानाही हा असाच प्रसंग घडला, तो सारा आपण जाणताच.)
सन 1656 ते 1674 असे तब्बल अठरा वर्ष रायगडाचे बांधकाम चालु होते.
या कालावधीत रायगडावर भक्कम तटबंदी, गोमुखी महाद्वार, , नानाविध दरवाजे, राजवाडा, राजदरबार, नगारखाना, राणी महाल, धान्य कोठारे, दारू कोठारे, टांकसाळ, अष्टप्रधान वाडे, राणी महाल, युवराजांसाठी महाल, गंगासागर सारखे तलाव, स्तंभ, शिव मंदिरे, शिर्काई देवी मंदिर, शिंबंदीच्या रहायच्या जागा, पर्जन्यमापक, हत्तीशाळा,अश्वशाळा, चोर दरवाजा, यांसारख्या तीनशे वास्तु बांधल्या.  यासाठी जवळपास 50 हजार होन खर्च झाले असावेत.
35 हजार होन दिगि घरें.-
15 हजार होन तट-
10 हजार होन गच्ची. (हे समजत नाही, बहुदा स्तंभ, नगारखाना आणि इतर साठी) एवढा खर्च केला गेला. 

(20 हजार होन तळीं, 2,5 हजार होन किल्ले.)

[संदर्भ- राखं. 8 पु 18 ले. 22. पसासं 1459.]
हे झाल रायगडावरील बांधकाम.. आता स्थापत्य बघुयात. रायगडाबद्दल सांगताना  म्हणतात (ही कथा कदाचित दंतकथा असावी) रायगड बांधुन झाल्यावर महाराजांनी हिरोजींना (कि हिराजी) विचारले कि सांगा राजधानी कशी आहे? त्यावेळी हिरोजी म्हणाले महाराज गडावरून महादरवाजा सोडल्यास वरून खाली फक्त पाणी, आणि खालुन वर फक्त वाराच जाऊ शकतो. अतिश्योक्ती सोडली तर हे खरंच आहे. गडाचे बांधकाम पुर्ण झाल्यावर तट व बुरूज बांधुन झाल्यावर आणि तोफा वर नेऊन जागा सुरक्षित केल्यावर महाराजांनी महादरवाजा बंद केला आणि लोकांना जमा केले अणि एक सोन्याने भरलेली एक पिशवी व शंभर होनांचे कडें पुढे ठेऊन जाहीर केले की जो कोणी वीर शिडी किंवा दोर यांच्याशिवाय व महादरवाज्या शिवाय किल्यावर चढुन येईल त्यास हे बक्षीस देण्यात येईल. तेव्हा एका व्यक्तीने गड चढला आणि महाराजांना रामराम केला. महाराजांनी त्याला बक्षीस देऊन तो रस्ता कायमचा बंद केला. (बहुदा हीच कथा पुढे हिरकणी नावाने प्रसिद्ध झाली असावी.)
हे सारे यात यासाठी की रायगड अभेद्य करण्यात या सार्‍याचा सिंहाचा वाटा होता; चुकुन एखादी वाट रहायला नको आणि नको ते घडायला नको.  
आता आपण बघुयात गडावरील स्थापत्य.
गडावरील बांधकाम हे मराठा पद्धती बरोबरच इतर पद्धतीचेही आहे. 
उदा- स्तंभ हे निजशाही पद्धतीचे आहेत. जगदिश्वराचा कळस हा मुसलमानी पद्धतीचा आहे.
गडावरील स्थापत्य- भाग 1 द्वार (दरवाजा).
महादरवाजा:-
 रायगडवर जाणारी कोणतीही वाट ही पुढे महादरवाज्यालाच मिळते. (नाना दरवाजा, चित्त दरवाजा, वाळुसरे खिंड) हा दरवाजा गोमुखी असुन शत्रुला शेवट पर्यंत दिसत नाही. आपलेच काही मराठी माणसं फक्त जंजिराला जाऊन त्याचा दरवाजा बघतात  आणि आपल्याला सांगतात कि तो दरवाजा दिसत नाही तेव्हा त्यांची खरच किव येते. असे दरवाजे आपल्या बर्‍याच किल्यांना आहेत. (असही जंजिराला सांगितला जाणारा इतिहास हा 95% खोटाच आहे.) या दरवाज्याला दोन बुरूज आहेत.. डावीकडील 65 फुट उंच आणि उजवीकडील 75 फुट उंच आहे. या दरवाज्यावर दोन्ही बाजुस कमळपुष्प आहेत, याचा अर्थ होतो की या ठिकाणी लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत आहेत. या दरवाज्यातुन आत गेल्यावर उजवीकडील जागेत एक शिलालेख आहे. पुसट झाल्यामुळे त्याचे वाचन मात्र करता येत नाही. सध्या यावर शेंदुर लावला आहे त्यामुळे ही जागा लगेच नजरेस भरेल. गडावर येणाऱ्या बर्‍याच लोकाना हा शिलालेख माहीतच नसतो.
 
या दरवाज्यातुन आत गेल्यावर पुढे लगेच डावीकडे दरवाज्याच्या शिबंदिची जागा आहे.  दरवाज्याचे गोमुखी वळण पार केल्यावर परत दोन बुरूज लागतात..  ते मोरेंच्या काळातील असावेत आणि महादरवाजा ते हे बुरूज असा त्यावेळेस मार्ग असावा. गोमुखी महादरवाजा बांधण्या अगोदरचा तो मार्ग असावा. 
श्री. प्र. क घाणेकरांनी मांडलेल्या कल्पनेप्रमाणे रायगडावर दुर्ग विज्ञान वापरले आहे. रायगडची वाट ही गड उजवीकडे ठेऊन आहे, म्हणजे शत्रुच्या उजव्या हातात तलवार असली आणि वरून साधा दगड जरी फेकला तरी तो अडवण्यासाठी त्याला डाव्या हातातील ढाल पुढे करावी लागेल आणि तो अडकून राहील.
या दरवाज्यातुनही शत्रु आत आलाच तर तो दरवाज्याची रचना बघुन चक्रावेल.. कारण बहुतांश गडावर मुख्य दरवाजा ओलांडल्यावर सरळ जाण्यास मार्ग असतो, इथे मात्र उलट आहे.. इथे जागेवरच वळण घ्यावे लागते. आणि इथुन पुढची वाटही सोपी नाही तर दमवणारीच आहे. सरळ सोट पायर्‍या आहेत ज्या दमवतातच. म्हणजे जरी शत्रुने महादरवाजा पार केला तरीही तो वर येईपर्यंत थोडा कालावधी मिळेल आणि प्रतिकार करता येईल. 

नाना दरवाजा :-
हा नाना दरवाजा म्हणजेच शिवकाळात गडावर येण्याचा राजमार्ग होता. याची बांधणीही महादरवाज्यासारखीच असुन याला छोटा महादरवाजा म्हणाल्यास वावगं ठरणार नाही. राजाभिषेकास आलेला इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन हाही याच मार्गाने रायगडावर आला होता.
 
आजमीतीस या दरवाज्यातुन रहदारी होत नसल्यामुळे आणि ही वाट फारशी प्रचलित नसल्याने या दरवाज्याची अवस्था बिकट आहे. वास्तविक पाहता हाच  राजमार्ग होता, चित्त दरवाज्यातुन लागणार्‍या उन्हा पासुन वाचण्यासाठी आणि डोंगरी मार्गाचा अनुभव घेण्यासाठी हाच मार्ग वापरायला हवा. या दरवाज्यातुन जाताना लागणार्‍या पिण्याच्या पाण्यासाठी इथे एक टाकही होतं.. सध्या ते आढळत नाही, माती आणि राडारोडा जाऊन ते बुजलं असावं. या नाना दरवाज्यास दोन कमानी आहेत, या दोन कमानीतील अंतर दहा फुट आहे, पहील्या कमानीची उंची 12 फुट तर दुसर्‍या कमानीची उंची 14 फुट आहे.  दरवाज्याच्या दर्शनी भागात दोन बुरूज आहेत जे वीस फुट उंच आहेत. दरवाज्याच्या आतील बाजुस दगडात पहारेकर्‍यांसाठी दोन खोल्या आहेत. 1974 च्या पुर्वी या दरवाज्याच्या एका कानोड्यात एका हत्तीची ओबढधोबड प्रतिमा होती, आता ती नाही. (सं- दुर्गदुर्गेश्वर रायगड. पान-47). या दरवाज्या पासुन महादरवाजा जवळपास 1000 (एक हजार) फुट उंचीवर आहे.



वाघ दरवाजा (चोर दरवाजा:-

रायगडावर असलेल्या मुख्य दरवाज्याशिवाय अडचणीच्या वेळेला उपयोगी पडावा म्हणुण बांधला गेलेला हा चोर दरवाजा. "किल्यास एक दरवाजा थोर अयब आहे" (म्हणजे किल्यास एकच दरवाजा असणे हे चुकीचे आहे.)  "याकरीता एक दोन तीन दरवाजे तसेच चोरदिंड्या करून ठेवाव्यात" असे रामचंद्रपंत अमात्य 'आज्ञापत्र' या ग्रंथात सांगतात. म्हणुणच गडावर मुख्य दरवाज्याशिवाय याची उभारणी झालेली असावी. हा दरवाजा कुशावर्त तलावाच्या पुढे उतारावर आहे. हा दरवाजा आजही भक्कम बांधणीचा आहे... मात्र इथवर जाण्याची वाट थोडी अवघड आहे. इथुन खाली उतरण मात्र महाभयंकर. प्रस्तारोहनाच (क्लाइंबिंग) तंत्र  वापरून खाली उतरावे लागेल. पुर्वी इथुन खाली उतरण्यास रस्ता (किमान पाऊलवाट) असावी, राजाराम महाराजांनी याच मार्गे रायगड सोडल्यानंतर ती मोडण्यात आली असावी. येथुन जवळच काळघाईची गुहा आहे.




चित्त दरवाजा:-
सध्या पाचाडवरून जी वाट गडावर जाते ती खुबलढा बुरुजाच्या येथुन गडावर येते. सध्या याठिकाणी चित्त दरवाजा अशी पाटी असली तरी या दरवाज्याचे कोणतेही कसल्याही प्रकारचे अवशेष नाहीत. खुबलढा बुरूजालाच लागुन हा दरवाजा पुर्वी असावा. आत्ता मात्र फक्त बुरूज आहे.
गडावरील स्थापत्य - भाग 2...
पाण्याची व्यवस्था... लवकरच

Sunday, 20 August 2017

रायगडचा पुर्वइतिहास...

रायगडची माहिती घेताना ती प्रामुख्याने सुरवातीपासूनच घ्यायला हवी. रायगडचा इतिहास हा बराच प्राचीन आहे. रायगडवरील काही स्थान ही अगदी सातवाहन कालीन असल्याच बोललं जात असलं तरी त्याचा खास पुरावा मात्र नाही. पण ही स्थानं एवढी जुनी आहेत हे मात्र नक्की. इ.स 12 व्या शतकात रायरी उर्फ रायगिरी हे एका मराठा पाळेगाराचे (पाळेगार म्हणजे सामंत) निवासस्थान होते. या मराठा पाळेगाराने 14 व्या शतकात विजयनगरच्या (अनागोंदी) सम्राटाचे स्वामित्व पत्करले व 1436 मधे अल्लाउद्दीन बहमनी दुसरा याचा तो मांडलिक झाला. पुढे 1479 मध्ये रायरी अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. 1628 मध्ये आदिलशाही व निजामशाही या दोघांत जावळीच्या वर्चस्वासाठी लढत सुरू झाली. यावेळी रायरीचे हवालदार होते राजे पतंगराव. हवालदार म्हणजे प्रादेशिक अधिकारी. 1621 मधे राजे पतंगरावांची बदली होऊन मलिक जमरूत हा रायगडचा हवालदार झाला. 1624 मधे इब्राहिमखान नावाचा हवालदारही होता. 6 मे 1636 रोजी आदिलशहा व निजामशहा यांच्यात झालेल्या तहानुसार रायरी आदिलशाहीकडे गेला. यावेळी रायरीकडे आदिलशहाचे प्रत्यक्ष लक्ष होते हे लक्षात येते. पुढे महाराजांनी रायरी चंद्रराव मोरेंकडुन जिंकुन घेतली. मात्र याही घटनेला पुर्वइतिहास आहे. महाराज आणि मोरेंचा पहिला संबंध आला सन 1648 मधे. यावर्षी मोरे घराण्याचा प्रमुख दौलतराव मोरे मरण पावला. त्याला मुलगा नव्हता, त्यावेळी महाराजांनी दिलेल्या सल्याप्रमाणे दौलतराव मोरेच्या बायकोने 'यशवंतराव' नावाचा मुलगा दत्तक घेतला आणि हणमंतराव मोरे याच्या मदतीने जहागीरीचा कारभार चालवला. पुढे महाराज जावळी खोर्‍यात शिरल्यावर प्रतापराव मोरे विजापुरला पळाला आणि मोरेंचा प्रमुख यशवंतराव जावळीहुन पळुन रायरीस आला. हा यशवंतराव रायरीवरून उपद्रव करू लागला तेव्हा स्वतः महाराज 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस आले व त्यांनी  रायरीस वेढा दिला. {यात एक गोष्ट समजुन घ्या.. रायरीस म्हणजे रायगडास वेढा दिला म्हणजे संपुर्ण किल्ल्याच्या खाली वेढा दिला असा होत नाही, तर मुख्य जागी जेथून रसद पुरवली जाऊ शकते किंवा शत्रु निसटु शकतो अश्या ठिकाणी हा वेढा जास्त भक्कम असतो. ज्यांनी रायगड प्रदक्षिणा केली आहे, त्यांच्या लगेच लक्षात येईल. }
 
एप्रिल महिना तसाच जाऊन पुढे यशवंतरावाने गुंजमावळचा देशमुख सिलीमकर { शिळीमकर} यांच्या मध्यस्थीने गडाखाली येऊन महाराजांची भेट घेतली व रायरी महाराजांकडे आली. {यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे एप्रिल ते मे या काळात यशवंतराव मोरे रायरीवर होता, म्हणजे त्याच्याकडे किमान एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य होते, ते साठवण्यासाठी नक्कीच गडावर धान्य कोठार असावे. यावेळी चंद्रराव मोरे बरोबर किती माणसे गडावर होती हे कळलं तर अंदाज येऊ शकतो.}
जावळीचा संपुर्ण प्रदेश महाराजांनी का घेतला असावा, त्याची कारणे ही असावीत- 
राज्य चालते ते मुळात आर्थिक सबलतेवर. (इथे थोडा प्रॅक्टीकल विचार करूयात.) 
मोरे याच आर्थिक उत्पन्नावर उन्मत्त झाले होते. यात मुख्य प्रवाह होता घाट वाटा आणि जकाती मधुन मिळणारे उत्पन्न. महाराजांनी या सर्व घाट, खिंडी आणि चौक्या आपल्या ताब्यात घेतल्या. यात प्रामुख्याने या वाटांचा समावेश होता. 
 1. मौजे केवनाळें व किसनेर या गावातुन पारघाटास गायमुखाने वर मिळणारा घाट, 
2. मौजे क्षेत्रपाळ व कुमटें यांच्या दरम्यानचा काळधोंडीचा मार्ग. 
3. काळेनळीचा घाट व मार्ग. 
4. ढवळा घाट 
5. सापळखिंड 
6. मौजे कर्जेचा घाटमार्ग. 
7. हातलोटचा घाट 
8. पारघाट.  
हे घाट आणि मार्ग महाराजांनी आपल्या ताब्यात घेतले आणि यातुनच आर्थिक उत्पन्न मिळु लागले. 
ज्या प्रमाणे सुरत लुटून सिंधुदुर्ग बांधला त्याचप्रमाणे महाराजांनी आणखी एक खजिना लुटला.. 
कल्याणचा सुभेदार अल्ला अहमद खजिना घेऊन विजापुरकडे निघाला होता, त्याची बातमी महाराजांना समजली, महाराजांनी तो खजिना लुटला व तोच पुढे रायगडच्या बांधकामास उपयोगी आला. रायगडचे बांधकाम सन 1656 ते 1674 पर्यंत चालले. त्यानंतरही काही बांधकाम चालुच असणार हे गडावरील काही ठिकाणी उंचवट्यावर असलेल्या खडकावरून लक्षात येते. हा झाला रायगडचा संक्षिप्त पुर्वइतिहास.. आता यापुढे आपण रायगडचे बांधकाम आणि स्थापत्य याबद्दल माहिती घेऊ.\
 संदर्भ - बखर, आज्ञापत्र, रायगडची जीवनकथा,  दुर्गदुर्गेश्वर रायगड,  इंग्रज मराठा संदर्भ,  मी पाहिलेला रायगड आणि सर्व रायगड अभ्यासक.

Saturday, 19 August 2017

रायगड आणि मी #1


रायगड आणि मी...
स्तंभ. 

नगारखाना 

रायगड.. स्वराज्याची दुसरी राजधानी. 

The capital of Maratha Empire...

"पुर्वेकडचा जिब्राल्टर" म्हणुन  ज्याची नोंद सातासमुद्रापल्याडील इंग्रजांनी केली तोच हा रायगड. अभेद्य, अविचल, रांगडा आणि कणखर.

रायगड बद्दल आजवर बर्‍याच जणांनी बरंच काही लिहलं आहे, सांगीतल आहे, अनुभवलही आहे. पण या लेखातुन मला, मी पाहीलेला रायगड सांगायचा आहे.. म्हणुन हा अट्टाहास.
तसा मी रायगडावर बर्‍याचदा गेलो आहे.. सन 2011 पासुन महीन्यातुन किमान एकदा तरी  जातो, ते ही मुक्कामी.
2012 साली ऐन दिवाळीत रायगडावर होतो..  ज्या गडकिल्यांच्या सोबतीने स्वराज्याचे शिवधनुष्य समर्थपणे पेललं गेलं तेच गडकोट ऐन दिवाळीत अंधारात असतात, अगदी राजधानी रायगडही. याच गोष्टीची खंत मनात बाळगून त्याच वर्षीपासुन 'एक पहाट रायगडावर' हा उपक्रमही सुरू केला. आणि पणत्या, मशालींच्या झगमगाटात रायगड पाहण्याच सौभाग्य दरवर्षी मिळत गेलं.
मी आजवर असे बरेच व्यक्ती बघीतलेत जे म्हणतात की मी रायगड बघीतला. माझा प्रश्न तोच असतो.. तुम्ही बघीतला कि पाहीला? प्रथमदर्शनी जरी हे दोन्ही शब्द समानार्थी वाटत असले तरी त्यातला गहनपणा जास्त आहे. तुम्ही रायगड फक्त बघीतलाय, तो अनुभवला नाही. जर त्यातल्या बारीक सारीक गोष्टी अनुभवल्याच नाहीत तर तुम्हाला रायगड दिसणार तरी कसा? समजणार तरी कसा?
रायगडावर जाऊन नक्की काय बघाव? कसं बघावं.. आणि का बघाव हे मी थोडफार समजावुन सांगु शकतो.  ज्ञात-अज्ञात सर्व अभ्यासकांची पुस्तके आणि प्रत्यक्ष चर्चा 
करुन मीही थोडाफार रायगड अनुभवलाय.
या सार्‍याची थोडक्यात आणि सोप्या भाषेत मांडणी मी नक्कीच करेन. बर्‍याच गोष्टी मला समजल्यात, त्या याआधी अन्य कोणाला कळल्या असतील, नसतील. मात्र मी सह्याद्रीच देणं लागतो म्हणुन हा प्रयास.
रायगडच्या वास्तुुचं अभ्यासपुर्ण आणि शास्त्रीय दृष्ट्या 
महत्व काही भागात मी हळुहळू मांडेनच.
एक-एक वास्तुची मी माहीती देत राहीन, तुम्ही वाचत रहा.असो.  लेखन सीमा..
कळावे- हर्ष पवळे. (सह्याद्री मित्र)