रायगडची माहिती घेताना ती प्रामुख्याने सुरवातीपासूनच घ्यायला हवी. रायगडचा इतिहास हा बराच प्राचीन आहे.
रायगडवरील काही स्थान ही अगदी सातवाहन कालीन असल्याच बोललं जात असलं तरी त्याचा खास पुरावा मात्र नाही. पण ही स्थानं एवढी जुनी आहेत हे मात्र नक्की.
इ.स 12 व्या शतकात रायरी उर्फ रायगिरी हे एका मराठा पाळेगाराचे (पाळेगार म्हणजे सामंत) निवासस्थान होते.
या मराठा पाळेगाराने 14 व्या शतकात विजयनगरच्या (अनागोंदी) सम्राटाचे स्वामित्व पत्करले व 1436 मधे अल्लाउद्दीन बहमनी दुसरा याचा तो मांडलिक झाला.
पुढे 1479 मध्ये रायरी अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला.
1628 मध्ये आदिलशाही व निजामशाही या दोघांत जावळीच्या वर्चस्वासाठी लढत सुरू झाली. यावेळी रायरीचे हवालदार होते राजे पतंगराव. हवालदार म्हणजे प्रादेशिक अधिकारी.
1621 मधे राजे पतंगरावांची बदली होऊन मलिक जमरूत हा रायगडचा हवालदार झाला. 1624 मधे इब्राहिमखान नावाचा हवालदारही होता.
6 मे 1636 रोजी आदिलशहा व निजामशहा यांच्यात झालेल्या तहानुसार रायरी आदिलशाहीकडे गेला. यावेळी रायरीकडे आदिलशहाचे प्रत्यक्ष लक्ष होते हे लक्षात येते. पुढे महाराजांनी रायरी चंद्रराव मोरेंकडुन जिंकुन घेतली.
मात्र याही घटनेला पुर्वइतिहास आहे. महाराज आणि मोरेंचा पहिला संबंध आला सन 1648 मधे. यावर्षी मोरे घराण्याचा प्रमुख दौलतराव मोरे मरण पावला. त्याला मुलगा नव्हता, त्यावेळी महाराजांनी दिलेल्या सल्याप्रमाणे दौलतराव मोरेच्या बायकोने 'यशवंतराव' नावाचा मुलगा दत्तक घेतला आणि हणमंतराव मोरे याच्या मदतीने जहागीरीचा कारभार चालवला.
पुढे महाराज जावळी खोर्यात शिरल्यावर प्रतापराव मोरे विजापुरला पळाला आणि मोरेंचा प्रमुख यशवंतराव जावळीहुन पळुन रायरीस आला. हा यशवंतराव रायरीवरून उपद्रव करू लागला तेव्हा स्वतः महाराज 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस आले व त्यांनी रायरीस वेढा दिला. {यात एक गोष्ट समजुन घ्या.. रायरीस म्हणजे रायगडास वेढा दिला म्हणजे संपुर्ण किल्ल्याच्या खाली वेढा दिला असा होत नाही, तर मुख्य जागी जेथून रसद पुरवली जाऊ शकते किंवा शत्रु निसटु शकतो अश्या ठिकाणी हा वेढा जास्त भक्कम असतो. ज्यांनी रायगड प्रदक्षिणा केली आहे, त्यांच्या लगेच लक्षात येईल. }
एप्रिल महिना तसाच जाऊन पुढे यशवंतरावाने गुंजमावळचा देशमुख सिलीमकर { शिळीमकर} यांच्या मध्यस्थीने गडाखाली येऊन महाराजांची भेट घेतली व रायरी महाराजांकडे आली. {यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे एप्रिल ते मे या काळात यशवंतराव मोरे रायरीवर होता, म्हणजे त्याच्याकडे किमान एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य होते, ते साठवण्यासाठी नक्कीच गडावर धान्य कोठार असावे. यावेळी चंद्रराव मोरे बरोबर किती माणसे गडावर होती हे कळलं तर अंदाज येऊ शकतो.}
जावळीचा संपुर्ण प्रदेश महाराजांनी का घेतला असावा, त्याची कारणे ही असावीत-
राज्य चालते ते मुळात आर्थिक सबलतेवर. (इथे थोडा प्रॅक्टीकल विचार करूयात.)
मोरे याच आर्थिक उत्पन्नावर उन्मत्त झाले होते. यात मुख्य प्रवाह होता घाट वाटा आणि जकाती मधुन मिळणारे उत्पन्न. महाराजांनी या सर्व घाट, खिंडी आणि चौक्या आपल्या ताब्यात घेतल्या. यात प्रामुख्याने या वाटांचा समावेश होता.
1. मौजे केवनाळें व किसनेर या गावातुन पारघाटास गायमुखाने वर मिळणारा घाट,
2. मौजे क्षेत्रपाळ व कुमटें यांच्या दरम्यानचा काळधोंडीचा मार्ग.
3. काळेनळीचा घाट व मार्ग.
4. ढवळा घाट
5. सापळखिंड
6. मौजे कर्जेचा घाटमार्ग.
7. हातलोटचा घाट
8. पारघाट.
हे घाट आणि मार्ग महाराजांनी आपल्या ताब्यात घेतले आणि यातुनच आर्थिक उत्पन्न मिळु लागले.
ज्या प्रमाणे सुरत लुटून सिंधुदुर्ग बांधला त्याचप्रमाणे महाराजांनी आणखी एक खजिना लुटला..
कल्याणचा सुभेदार अल्ला अहमद खजिना घेऊन विजापुरकडे निघाला होता, त्याची बातमी महाराजांना समजली, महाराजांनी तो खजिना लुटला व तोच पुढे रायगडच्या बांधकामास उपयोगी आला. रायगडचे बांधकाम सन 1656 ते 1674 पर्यंत चालले. त्यानंतरही काही बांधकाम चालुच असणार हे गडावरील काही ठिकाणी उंचवट्यावर असलेल्या खडकावरून लक्षात येते. हा झाला रायगडचा संक्षिप्त पुर्वइतिहास.. आता यापुढे आपण रायगडचे बांधकाम आणि स्थापत्य याबद्दल माहिती घेऊ.\
संदर्भ - बखर, आज्ञापत्र, रायगडची जीवनकथा, दुर्गदुर्गेश्वर रायगड, इंग्रज मराठा संदर्भ, मी पाहिलेला रायगड आणि सर्व रायगड अभ्यासक.
खूप छान माहिती.
ReplyDeleteखूप छान माहिती सदर्भा साठी कोणते पुस्तक आहे वाचनासाठी
ReplyDeleteब्लॉग च्या खाली संदर्भ दिले आहेत.
DeleteGood work- Milind Kshirsagar
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete