Wednesday, 8 April 2020

जुव्याचा दुर्ग- उर्फ सेंट इस्टेवांम. ( गोवा)

        जुव्याचा दुर्ग (किल्ला) उर्फ सेंट इस्टेवांम.
                 
              "फिरंग्याचे दैव समुद्रांनी रक्षिले."
मराठे पोर्तुगीज लढाईच्या इतिहासातील एक सुवर्ण पान या दुर्गामुळे लिहल गेलं.

1689 साली पोर्तुगीजांनी टेहाळणीसाठी मराठे व पोर्तुगीज यांच्या सीमेवर तिसवाडी तालुक्यातील डिचोली व फोंडा या तालुक्याच्या सीमाभागात असलेल्या मांडवी नदीच्या बेटावर एका टेकडीवर किल्ला बांधला.

 या जुवे बेटावरील किल्ल्याला कॅथलिक संताच्या नावावरून सेंट इस्तेव्हांव अस नाव पोर्तुगीजांनी दिले.  या किल्ल्याच्या चारही बाजूला नैसर्गिक दलदल आहे.


 अवघड वाट,मदतीला असणारा समुद्र (आणि पोर्तुगीज स्वतःला सात समुद्राचे स्वामी म्हणून घेत होते, त्यामुळे) पोर्तुगीजांनी जुना गोव्यात त्यांची राजधानी स्थापन केली. राजधानीच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला पोर्तुगीजांकडे असने अत्यंत महत्वाचं होत, हे जसे पोर्तुगीजांना माहीत होतं... तसच छत्रपती संभाजी महाराजांनाही माहीत होतं, जर फोंडा जिंकल्यानंतर पुढे जुन्या गोव्यात सत्ता स्थापन करायची असेल तर हा किल्ला ताब्यात घेणं फार गरजेच होत, आणि त्यासाठी 24 एप्रिल 1683 रोजी छत्रपतींनी एक गुप्त मोहीम हातात घेतली, रात्री 8 च्या सुमारास महाराजांच सैन्य कालवा (नैसर्गिक दलदल) पार करून जुवे गावात शिरलं.  महाराजांनी ही मोहीम अत्यंत गुप्त ठेवली होती, कोणालाही या मोहिमेचा कानोकान खबर नव्हती. (खरंतर अश्या जोखमीच्या मोहिमेसाठी गुप्तहेर खात फार उपयोगी ठरत हे इतिहास सांगतो, त्याशिवाय अश्या लढाया यशस्वी होत नसतात.  मात्र या ठिकाणी गुप्तहेर कोण होत हे इतिहासालाच माहीत..) रात्रीच्या अंधारात गनिमी काव्याच्या आधारे मराठ्यांनी त्या छोट्याश्या जुवे किल्यावर हल्ला केला, ( किल्ला फार छोटा होता, आपल्या जाधवगड एवढा)

 रात्री हल्ला करून गड ताब्यात घेणं मराठ्यांना नवीन नव्हतं, पन्हाळा, सिंहगड सारखी कैक उदाहरण डोळ्यासमोर होती. त्यातही हा छोटा किल्ला आणि समोर पोर्तुगीज सैन्य. अचानक झालेल्या हल्ल्याला पोर्तुगीज तोंड देऊ शकले नाही आणि त्यांनी हार मानली. गड मराठ्यांच्या ताब्यात आला, जुव्यावर भगवा फडकला.
सपाटून मार खाल्लेले पोर्तुगीज पळून जाऊन धावजी नावाच्या जुन्या गोव्यातील गावात गेलं आणि त्यांनी पोर्तुगीजांना माहिती दिली की संभाजीने जुवे बेट आणि किल्ला घेतला. ज्या किल्ल्याच्या आधारावर पोर्तुगीज गोव्यातील राजधानी ठरवत होते, तो किल्ला मराठ्यांनी असा रात्रीत जिंकून घेतल्याने पोर्तुगीजांची दातखिळी बसली. ज्याचा विचार त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असताना केला नव्हता, ती गोष्ट त्यांच्या मुलाने सहजशक्य केली होती. पोर्तुगीजांनी मनोमन देवाचे आभार मानले असतील, नशीब त्यावेळी शिवाजीने याचा विचार केला नाही...
(थोरल्या महाराजांची गोवा स्वारी यावर सविस्तर लेख नंतर लिहणार आहे)
पोर्तुगीज विरजई आणि पाद्री लोकांची तर बोबडी वळली... (हेच ते पाद्री लोक जे हिंदूंवर अत्याचार करीत होते, लोकांचे कान कापुन टाकत, आणि स्त्रियांना बाटवत होते. आता संभाजी आपले काय हाल करणार याची त्यांना जाणीव झाली होती.) या लढाईच्या अवघ्या 15 दिवसापूर्वी दुर्भाटच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव झाला होता. आणि आता हे दुसरं संकट...
रात्री जुन्या गोव्यात पोर्तुगीजांना छत्रपती संभाजी महाराजांनी जुवे बेट घेतल्याची बातमी मिळाली आणि त्यांचा ठाम समज झाला की उद्या संभाजी जुन्या गोव्यात येणार आणि आपली सत्ता संपावणार. चर्च मधील मोठमोठ्या घंटा येणाऱ्या प्रलयाची जाणीव देत जोरजोरात वाजत होत्या, तसा आदेशच दिला असेल.. रात्रभर कोणालाही झोप नव्हती... लागणारही नव्हती.
संभाजी उद्या आपल्यावर चालून येईल त्या ऐवजी आपणच त्यावर चालून जाऊ अस विजरई कोंद-दि-आल्व्हर ने ठरवलं. आणि तो रात्रीच सैन्य घेऊन जुवे बेटाकडे निघाला. मात्र तो धावजीत थांबला. धावजी हा 2 बुरुज असलेला छोटासा किल्ला होता, या किल्ल्यावर स्वतः विजरई कोंद-दि-आल्व्हर रात्रभर पहारा देत राहिला.

इकडे किल्ला जिंकला त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25  एप्रिल ला स्वतः संभाजी महाराज किल्ला बघायला जुवे  बेटावर आले. स्वतः शिवरायांचा पुत्र संभाजी महाराज जुव्याचा आले आहेत हे बघून तिथल्या पंचक्रोशीतील जनता महाराजांच्या दर्शनाला जमली.

सकाळी 10 च्या सुमारास विरजई धावजी उतरून जुवे गावात शिरला... पोर्तुगीज सैन्य बघून सुरवातीला मराठे मागे फिरले.. मराठ्यांना मागे फिरताना बघून विरजई आणि त्याच्या सैन्याला जोश आला.. पण आपण स्वतःहून मृत्यच्या दारात चाललो आहोत याचा त्यांना अंदाजही नव्हता.  मराठ्यांचा गनिमी कावा या भूतलावर कोणालाही कळला नव्हता- तोरणा जिंकून स्वराज्याच बांधलेलं तोरण असो- आग्र्यातून यशस्वीपणे निसटलेले महाराज असो- पन्हाळाचा वेढा फोडून गेलेले महाराज असो- की सुरतेची लूट असो- अशी असंख्य प्रकरणे होती जिथला गनिमी कावा शत्रूला आजही कळला नव्हता- मरेपर्यंत कळणार नव्हता.
तर मराठयांना पळताना पाहून त्यांच्या मागे लागलेले सैन्य आता किल्याच्या जवळ आलं होतं, आणि अचानक पळणारे मराठे मागे फिरले आणि त्यांनी पोर्तुगीजांवर हल्ला चढवला, अचानक झालेला हा बदल पाहून विरजई पुरता गोंधळून पडला, आणि त्यातच स्वतः संभाजी महाराज त्यांचं घोडदळ घेऊन युद्धात सहभागी झाले. आता मात्र संभाजी महाराज बेभान होऊन लढत होते... त्यांचं ते रूप बघून विरुजई कडे पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. विरजई आल्या मार्गे पळाला... पण भरतीमुळे वाढलेलं पाणी आणि परतीचे तुटलेले दोर यामुळे काय करावं हे त्याला कळेना- त्याने पाळणाऱ्या सैन्याला थांबवायचा प्रयत्न केला, मात्र त्या रुद्रावतारासमोर सगळेच हतबल झाले होते, छत्रपती संभाजी महाराज सगळ्यांची कत्तल करतच होते, विरजई ला काय करावं कळत नव्हतं...आणि शेवटी तो दलदलीतून पलीकडे धावजीकडे पळत सुटला- त्याबरोबर असलेल्या सैन्याला मारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या मागे मागे होते- विरजई खाडी जवळ पोचला हे बघून महाराजांनी घोडा सरळ खाडीच्या दिशेने घातला, खाडीला पाणी जास्त होतं..आणि अचानक महाराजांचा घोडा उलटला...... महाराज पाण्यात पडले आणि मागून येणाऱ्या चिटणीस खंडो बल्लाळ याने पाण्यात उडी मारून संभाजी महाराजांना पाण्यातून बाहेर काढले... हे तेच खंडो बल्लाळ ज्यांच्या वडिलांना महाराजांनी गैरसमजुतीतुन हत्तीच्या पायी देऊन मारले होते. पुढे चूक लक्षात आल्यावर महाराजांनी त्यांची समाधी बांधली आणि खंडो बल्लाळ याना सेवेत रुजू केले.
विजरई परत एकदा आपला जीव वाचवून जुन्या गोव्यात पळाला. आता तर जुन्या गोव्यातील चर्च आणि कॅथलिक मठांमध्ये हाहाकार उडाला होता. पोर्तुगीजांची फजिती आणि संभाजी महाराजांचा पराक्रम जुवे पंचक्रोशीतील जनता आपल्या डोळ्यांनी त्या दिवशी पाहत होती. 




त्या दिवशी मराठा सैनिकांनी जुवे गावातील पोर्तुगीजांचे चर्च आणि मठाची लूट करून त्याची मोडतोड करून टाकली आणि दुसऱ्या दिवशी जुवे गाव सोडून संभाजी महाराज परत फोंड्यास आले.
 त्यामुळे खरेच ते दिवशी फिरंग्याचे दैव समुद्रांनी रक्षिले.

लेख आवडला असल्यास अथवा काही प्रश्न असल्यास जरूर कमेंट करा. 
धन्यवाद.


फोटो साभार - सुप्रभा बहिरम. 
संदर्भ- मराठे पोर्तुगीज संबंध.
श्री सचिन मडगे यांचे लेख.

Thursday, 26 March 2020

पांडवांची गादी - एक गूढ...

           पांडवांची गादी... न उलगडलेलं कोडं.

मध्यंतरी रायगडच्या फेऱ्या वाढल्या होत्या, रायगडावर एक दोन नव्हे 4 हक्काची घर झाली आहेत, सखू मावशी, गोरे काका, गणेश ही मंडळी त्यापैकीच. जेव्हापासून रायगडला येणं होत होत , तेव्हापासून ऐकत होतो की रायगडच्या मागील बाजूस म्हणजे मानगडच्या जंगलात आहे पांडवांची गादी.

रायगड आणि परिसर हा तसा प्राचीन...
पण त्याचा संबंध थेट महाभारतात/ रामायणात जातो हे माहीत नव्हतं.
कुठे तरी वाचलं होतं की ह्या भागात कुठेतरी प्रभू श्रीराम आणि पांडवांचा स्वतंत्र मुक्काम पडला होता. पण ह्याचा पुरावा मिळत नव्हता.
2-3 वर्ष मी आणि माझे सहकारी 'अमोल तावरे' आम्ही ह्याचा पाठपुरावा करत होतो. रायगड आणि आसपासच्या भागात जाता येता चौकशी करत होतो, अचानक एके दिवशी आम्ही रायगडवरून मानगड- पाचाड मार्गे परत येताना एक बातमी लागली की मानगडच्या पायथ्याशी असलेल्या धनगरवाडीमध्ये बाळकृष्ण गव्हाणे (बुवा)  नावाची एक व्यक्ती आहे,  ज्याने ते पांडवांची गाडी किंवा "सिंहासन" बघितलं आहे... ही व्यक्ती देवीची पुजारी आहे आणि त्याला देवींनी साक्षात्कार दिला आणि वर दाट जंगलात असलेल्या हा जागेबद्दल दृष्टांत दिला....
 झालं त्या माणसाचा शोध घेतला आणि आमची स्वारी निघाली या ऐतिहासिक गोष्टीकडे.
धनगरवाडी गावातून 3-4 तास चालल्या नंतर(जंगलातुन-  कोणत्याही प्रकारची वाट नाही.. )  शेवटी आम्ही एका जागी आलो, संपूर्ण डोंगरावर चढ होता ( तो असतोच) पण इथे मात्र जवळपास 6-7 गुंठे एवढी सपाट जागा होती. मोठमोठे तळखडे होते सोबतच इतर अशा गोष्टी होत्या ज्या सिद्ध करत होत्या की इथे अगोदर कोणीतरी राहत असावं.

 बर ही जागा प्राचीन नसून शिवकालीन असावी किंवा फारफार तर त्या आधी 100 वर्षांपूर्वीची असावी असा विचार मनात आला, कारण इतिहास हा विषय भावनिक नसून वास्तववादी आहे हे आम्हाला माहीत होतं. पण या ठिकाणी असलेले तळखडे आणि ती जागा तसं दर्शवित नव्हती, आजवर वेगवेगळे किमान 200 किल्ले बघितले होते आणि त्यामुळे हे तळखडे शिवकालीन नाहीत असं पक्क झालं.

जो माणूस आम्हाला इथे घेऊन आला त्याला ह्या ठिकाणी काळघाई देवीचा (मोरेंची कुलदैवत) साक्षात्कार झाला होता, 
(याच ठिकाणी मोरेंनी देवीला कौल लावला होता,जेव्हा महाराजांनी रायरी म्हणजे रायगडचा डोंगर ताब्यात घेतला होता.

 आणि म्हणून फक्त हीच व्यक्ती आजवर इथवर येऊ शकली होती. अन्य कोणी इथे पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी त्याला वाट सापडत नसे. (ही माहिती आम्हाला परत खाली आल्यावर गावातल्या लोकांनी दिली. आणि तो आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता)   
याच ठिकाणी त्यांना सितामातेची जोडवी, गळ्यातील काही ऐवज, आणि बांगड्या(धातूच्या) सापडल्या. सोबतच यादव कालीन काही होन आणि सोन्याच्या मोहरा देखील सापडले. ( यातील काही गोष्टी आम्ही स्वतः बघितल्या आहेत, फोटो काढू न दिल्याने फोटो काढले नाहीत, नंतर कोणीतरी पुरातत्व विभागातून आलो आहे, अस सांगून यातील काही होण आणि बाकी वस्तू गायब केल्या; जी दुर्दैवी गोष्ट आहे.
ह्याच ठिकाणी【 पूर्वी आपण बघत असाल तर आठवेल की "सिंहासन बत्तीशी" कार्यक्रम लागत होता...】 त्यासारखं एक दगड आहे...ज्यात 32 दिवे लावायला जागा आहे.

 हा दगड आतून पूर्ण पोकळ आहे.. आणि त्याला आत जायला एक दरवाज्यासारखी जागा आहे ... पण ती बंद आहे.

संपूर्ण डोंगरावर उतार आहे पण फक्त हीच जागा सपाट आहे. ह्या ठिकाणी 12 महिने राणफळे, आणि जंगली फळे असतात जेणेकरून खाण्याची चिंता राहत नाही... जवळच एक छोटं तळ आहे, ज्यात जिवंत झरे असलेली विहीर आहे.
फक्त इथून फळे बाहेर नेऊ नये असं ते म्हणाले. आम्ही मनसोक्त 2 फणस खाल्ले..
जागेची पाहणी केली...  काही फोटो काढले आणि मागच्या प्रवासाला निघालो.
(टीप- सदर माहिती ही बुवा (ज्यांनी ही जागा शोधली ते आणि  स्थानिक लोकांनी दिली आहे, या बद्दल आम्ही सत्यता तपासण्यासाठी प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.) वर्ष - जून 2015

छत्रपतींनी गोव्यात बांधलेला किल्ला.

                 महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्र, अर्थात बेतुल दुर्ग.

                                       छत्रपतींनी गोव्यात बांधलेला किल्ला.

सर्व प्रथम गोव्या सारख्या महाराष्ट्रा शेजारी असलेला पण किल्यांवर फारसा अभ्यास न झालेल्या ठिकाणी अभ्यास करून किल्यांची माहिती लिहलेल्या श्री सचिन मदगे सर यांचे खूप खूप आभार, नाहीतर आमच्यासारख्या परराज्यात किल्ले फिरायला जाणाऱ्या लोकांचे माहितीअभावी  वांदे झाले असते.

महाराजांनी आदिलशाहीचा गोव्यातील मुलुख ताब्यात घेतल्यावर १६७९ (1679) च्या मे महिन्यात बाळ्ळीच्या हवालदाराला साऊथ गोव्यातील केपे तालुक्यातील बेतुल गावात जिथे समुद्र आणि नदी मिळते तिथे साळ नदीच्या किनाऱ्यावर दुर्ग (किल्ला) बांधायला सांगितला.
हा किल्ला सध्या ज्या ठिकाणी आहे ती जागा खाडी सारखी असून अलीकडील म्हणजे जिथे किल्ला आहे तो प्रदेश मराठ्यांकडे व समोरील म्हणजे नदीच्या पलीकडील प्रदेश हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. 
                फोटो बघून लक्षात येईल कि किल्ला किती महत्वाच्या ठिकाणी बांधला आहे. 

मराठे व पोर्तुगीज यांच्यात मैत्रीपूर्ण करार झाला होता, बेतुल किल्ला पोर्तुगीज प्रदेशातून अगदी समोर असला आणि बंदुकीच्या गोळीच्या टप्यात असला, तरीही पोर्तुगीजांचा हा किल्ला बांधायला विरोध होता. त्याला कारणही तसेच होते. नदी मार्गे समुद्रातून होणाऱ्या सागरी वाहतुकीवर निर्बंध येतील, त्यांच्या राज्याच्या सुरक्षिततेल धोका होईल आणि म्हणूनच  पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधायला विरोध केला.  याच अनुषंगाने पोर्तुगीजांनी या किल्ल्याचे बांधकाम थांबवण्यासाठी हालचाल करण्याचे ठरवले. १५ मे १६७९ रोजी पोर्तुगीज गव्हर्नर आणि कॅप्टन जनरल आंटॅनियु  पाइश-द-सांद यांनी राज्य सल्लागार मंडळाची सभा घेतली आणि ठरवले की राशोल (राईस) चा कॅप्टन फ्रान्सिस्कु-द-लैंताव याला पत्र पाठवून सर्व बातमी दिली आणि सांगितले की तुम्ही मराठ्यांना पत्र पाठवून सल्ला करावा, आणि किल्ल्यांचे बांधकाम बंद करावे, तसेच किल्ल्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी. गव्हर्नर च्या आज्ञेनुसार कॅप्टन ने बाळ्ळीच्या हवालदाराला पत्र पाठवले, त्यावर या हवालदाराने जे उत्तर दिले तर स्वराज्याचा अभिमान दाखवणारे होते. हवालदार उलट दिलेल्या पत्रात लिहतो की - " आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने किल्ला बांधत आहोत, किल्ल्याचा उपसर्ग (त्रास) तुम्हाला होणार नाही, आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट ही की आमच्या राज्यात आम्ही काहीही करण्यास मुखत्यार (मोकळे) आहोत, आम्हाला त्याचा जाब विचारणारे तुम्ही कोण? "
                                                दुर्गाचे (किल्याचे ) सध्याचे अवशेष

हवालदारचे हे उत्तर ऐकून गव्हर्नर  कॅप्टन व  फोंडयाच्या सुभेदाराला (पोर्तुगीज) पत्र लिहून बेतुल किल्ल्याकडे लक्ष द्यायला सांगतो. ( ज्याचे पुढे काय झालं माहीत नाही, ज्या अर्थी हा किल्ला बांधून झाला त्याअर्थी कदाचित त्यानेही काही केलं नसावं) पण पुढे गव्हर्नर कॅप्टनला असही सांगतो की जर सुभेदारच उत्तर आलं नाही तर तुम्ही सैन्य घेऊन जा आणि किल्ल्याचे बांधकाम पाडा, पण अस करताना हे काम सरकारच्या ( पोर्तुगीज सरकारच्या ( म्हणजे गव्हर्नरच्या) सहमतीने झालं आहे याचा सुगावा शिवाजीच्या (इथे महाराजांचा उल्लेख जसा पत्रात आलाय तसाच केलाय) लोकांना लागू देऊ नका. (हे वाचताना लक्षात येईल की फक्त महाराष्ट्रच नाही तर गोव्यातही महाराजांची दहशत होती, पोर्तुगीजांनीही मराठ्यांशी मैत्रीपूर्ण करार केला होता, आणि त्यांना धास्ती होती की हा हल्ला जर पोर्तुगीजांनी केला अस शिवाजीला कळलं तर शिवाजी आपल्यावर उलट हल्ला करेल,( आजवर शिवाजीचा एकही वार खाली गेला नाही, हे पोर्तुगीजांना चांगलेच माहीत होत...) पुढे पोर्तुगीजांनी हा किल्ला गुपचुप पडायचा अस ठरवलं, मात्र त्यांच्यात ते धाडस झालं नाही. 

या किल्ल्याचा उल्लेख पुढे १६८२-८३ ( छत्रपती संभाजी महाराजांचा काळ)  काळात  येतो ज्यात त्यांनी संभाजी राजेंविषयी आणि या किल्ल्याचा या पत्रात उल्लेख केला होता.
सध्या या किल्ल्याच्या ठिकाणी फक्त 1 बुरुज व तोफ आहे, बाकी परिसरात खूप झाडी आहे, सदर परिसर स्वच्छ केला तर आणखी काही सापडू शकते.

                                               सागर अभंग या मित्राला किल्ला दाखवताना.

सोबत या किल्ल्याचा लोकेशन मॅप देत आहे.
https://goo.gl/maps/wSqdQb54iNTVztEs9

 फोटो साभार-

आबासाहेब कापसे( गडवाट समूह)
सुप्रभा बहिरम
सागर अभंग.

संदर्भ -
पोर्तुगीज दफ्तरातील " अशांतूश दो कॉन्सीलो दो इस्तांद" खंड -04
शिवशाही पोर्तुगीज कागदपत्रे -
पत्राचा मराठी अनुवाद - गोव्याचे सुप्रसिद्ध इतिहास संशोधक "श्री सं.श. देसाई सर)
आणि सचिन मदगे सर यांचे लेख  ज्यांनी गोव्यातील किल्ले समजून घेण्यास ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्टीने मदत केली.

Wednesday, 25 March 2020

फोंडा कोट आणि मराठे पोर्तुगीज युद्ध. गोवा


     फोंडा कोट आणि मराठे पोर्तुगीज युद्ध.

स्थळ - गोवा


गोवा, देशातील सर्वात प्रसिदध पर्यटन स्थळांपैकी एक राज्य.  
गोव्यातील समुद्र, बीच, मंदिर आणि चर्च या सोबतच किंबहुना याहून अधिक महत्वाचा आहे तो तिथला इतिहास. जयकेशी कदंबापासून ते अगदी अलीकडील मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या पर्यंतचा.
याच गोव्यात पोंडा (फोंडा) हे नाव सगळ्यांनी ऐकले असेल, त्याच पोंडा किल्याचा हा थोडासा इतिहास. 
Photo - Google.

८ नोव्हेंबर १६८३ रोजी पोर्तुगीज विजरई कोंद-दी-आल्व्हर याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी फोंडा कोटावर तोफांचा मारा करून कोटाच्या तटाला मोठे भगदाड पाडले, हळू हळू तोफा आणि बंदुकीचा मारा करून हा कोट ताब्यात घ्यायचा विरजईचा विचार होता. 
रात्र झाली होती आणि लढाई थांबली होती, कोटाच्या आतील मराठे सैनिक त्यावेळी "काळ" बनून समोर ठाकलेल्या पोर्तुगीजांशी लढायला सज्ज होते. तिकडे देशावर छत्रपती संभाजीराजे मुघल, डच, इंग्रज, यांच्याशी लढतानाच्या आणि पराक्रमाच्या बातम्या ऐकून साऱ्या मराठ्यांच्या अंगात शौर्य धावत होत, आता काहिही झालं तरी माघार नाही, हा त्यांनी ठाम निर्णय घेतला होता. सोबतीला दैव असावं म्हणून देव देवाला, पिराला नवस केले होते... आणि त्यारात्री देव पावला. रात्री अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली, अचानक आलेल्या पावसामुळे पोर्तुगीजांची तारांबळ उडाली, त्यांचा दारुसाठा भिजला आणि निकामी झाला.

आता या पेक्षा चांगली गोहत ही झाली की ९ नोव्हेंबरच्या सकाळी स्वत: छत्रपती संभाजी महाराज राजपुरीहून  ९०० घोडेश्वार आणि २ हजार पायदळासह फोंड्याच्या कोटाजवळ येऊन पोहोचले. (अंतर तब्बल 450 km)  स्वतः छत्रपती आले हे बघून गडावरची लोक धन्य झाली, आता फोंडा तर देत नाहीच, पण सोबत गोवाही ताब्यात घेऊ इतका विश्वास आला. हा विश्वास आणि छत्रपतींना बघून विरजईने माघार घेतली, पोर्तुगीज सैन्य पळत सुटल. कोटातून पळणाऱ्या सैन्यावर बंदुकीचा मारा चालू झाला. पळून गेल्यामुळे तोफा बंदूकांसह ३०० पोती भात आणि २०० गाढवांवर राहिल एवढे सामान पोर्तुगीज घाबरून सोडून गेले, जीव वाचवा म्हणून. पोर्तुगीज पळून गेले ते दुर्भाट बेटावर ;पोर्तुगीजांचे बाकीचे सामान जसे की होड्या ई इथेच होते.
 याच ठिकाणी मराठे आणि पोर्तुगीज सैन्य जिथे गव्हर्नर होता, गनिमी काव्याच्या पध्दतीने लढलेल्या या युद्धात  जनरल रोद्रीगो द कोस्ता, कॅप्टन मानुएल सिल्वा आणि 200 पोर्तुगीज सैन्य मारले गेले.  यात स्वतः छत्रपती संभाजी महाराज युद्धात उतरले होते, बेटावर सर्वत्र रक्ताचा, मांसाचा खच पडला होता.  या लढाईत मराठ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीची सवंगडी येसाजी कंक, आणि त्यांचा मुलगा बाजी कंक यांनीही मैदान गाजवले. या लढाईत मात्र पोर्तुगीज व्हाइसरॉय निग्रो अंगरक्षकांमुळे वाचला...
पोर्तुगीज गव्हर्नर असा दिसत असेल ( चित्र रचनात्मक आहे)

 ज्या पोर्तुगीज गव्हर्नर, विरजई ने छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत पकडून मारायचा बेत केला होता, ते सगळे या लढाईत  जखमी झाले, आणि  असे बसे जुन्या गोव्यात जाऊन पोचले.
पोर्तुगीज गव्हर्नर, विरजई आणि सैनिक सगळेच घाबरून जुन्या गोव्यात पळाले...
पोर्तुगीज सैन्य अस दिसत असेल ( चित्र रचनात्मक आहे)

या पुढे काय झालं? पुढच्या भागात.
 (टीप   फोंडा या किल्याचे जास्त  अवशेष सध्या नाहीत, त्याजागी जवळच  प्रशासनाने शिवाजी फोर्ट उभारला आहे. )
Photo- Shivaji Fort.
https://goo.gl/maps/rdsnP9FLCLabctZY6
संदर्भ - 
1.मराठे पोर्तुगीज संबंध.
2.श्री. सचिन मदगे यांचे लेखन.
3.गुगल, गोव्यातील संग्रहालये आणि स्थानिक लोकांची माहिती.